औरंगाबाद : मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी आज मंगळवारी औरंगपुरा परिसरात पाहणी करीत असताना त्यांच्या नजरेस कुंभारवाडा परिसरातील व्यापार्यांची अतिक्रमणे आली आणि या अतिक्रमणावर बुल्डोझर फिरला.
औरंगपुरा, गुलमंडी आधी परिसरात व्यापारी व हॉकर्स असा नेहमी संघर्ष उभा राहतो. या हॉकर्स प्रश्न व्यापार्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली. नुकतीच व्यापार्यांनी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेतली होती. यावेळी आयुक्तांनी व्यापार्यांना कारवाईचे आश्वासन दिले होते. दरम्यान आज मंगळवारी पांडेय हे अधिकार्यांसमवेत या परिसराची पाहणी करण्याकरिता दाखल झाले. कुंभारवाडा परिसरात पायी फिरत असताना व्यापारयांची मोठी अतिक्रमणे असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनाला आले. अतिक्रमणे पाहून संतापलेल्या आयुक्तांनी थेट जेसीबी लावण्याचे आदेश दिले. आयुक्तांचे आदेश येताच अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांनी जेसीबी लावून अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या अतिक्रमण कारवाईने व्यापारी देखील हवालदिल झाले होते.